प्राचीन पुण्याच्या वारश्याचा उद्या हेरिटेज वॉक   

पुणे : ’टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’, ‘दै. केसरी’ आणि ’हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांसाठी हेरिटेज वॉक हा उपक्रम दर महिन्याला आयोजित करण्यात येतो. हा उपक्रम नि:शुल्क असून श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्राच्या सहकार्याने चालवण्यात येतो.
 
हा हेरिटेज वॉक उद्या (शनिवारी) सायंकाळी ५.३० वाजता कसबा पेठ पोलिस चौकीसमोरील शनिवारवाड्याच्या परिसरातून सुरू होणार आहे. या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होणाण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजता कसबा पेठ पोलीस चौकी समोर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  
 
हेरिटेज वॉक या उपक्रमात प्राचीन पुण्याची सफर घडवून आणली जाणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र, या शहराचा विकास लहान वसाहतीपासून महानगरापर्यंत झाला आहे. १२ व्या शतकात म्हणजे यादव राज्यांच्या काळात मुख्यतः आजच्या कसबा पेठेत या किल्ले हिस्सारचे बांधकाम झाले होते. पुढे काळाच्या ओघात तो नाहीसा झाला पण त्याचे काही दगड शनिवारवाडा बांधताना वापरले होते. आजही हे पहायला मिळतात. कसबा पेठेतील या परिसरात प्राचीन पुण्याचे इतर अनेक अवशेष आहेत. यापैकी एक म्हणजे सूर्य हॉस्पिटल जवळचे बाळोबा-मुंजोबा मंदिर. प्राचीन काळी येथील वस्तीच्या रक्षणार्थ मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या स्मारकाचे जतन या मंदिरात केलेले आहे. त्यांनाही या हेरिटेज वॉकमध्ये भेट दिली जाणार आहे. प्राचीन पुनवडीपासून सुरू झालेला हा पुण्याचा प्रवास या वारसा भेटीतून नामवंत इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे हे उलगडून दाखवणार आहेत. तसेच कसबा पेठेतील प्राचीन पुण्याच्या पाऊलखुणा अभ्यासण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. 
 

Related Articles